समाजाचे स्वरूप कसे आहे?www.marathihelp.com

प्रत्येक समाज सर्वसाधारणपणे प्रचलित झालेल्या सामूहिक संकल्पनांवर ( उदा., कायदा, धर्म, नीती इत्यादी ) आधारलेला असतो. या सामुदायिक संकल्पना मानवी जाणिवेवर सामाजिक पर्यावरणामुळे लादल्या जातात. प्रत्येक समाज सामाजिक एकतेने बांधलेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत एकता यांत्रिक असते, तर प्रगत अवस्थेत ती सेंद्रिय असते.

समाज सुसंगत चालण्यासाठी काही गोष्टी अपरिहार्य असतात : (१) परिस्थिती नियंत्रणात ठेवून साधने उपलब्ध करून देणे, (२) उद्दिष्टपूर्ती ( गोल ऑफ अटेनमेन्ट ), (३) समाजात स्थैर्य राखून त्याची घडी बिघडू न देणे ( पॅटर्न ऑफ मेन्टेनन्स ), (४) विविध घटकांमधील व बाहेरच्या समाजाशी संबंध दृढतर करून समतोल राखणे ( इंटिगेशन ). समाजरचना, तिचे कार्य व स्वरूप यांचे विश्लेषण, हा समाजशास्त्राचा प्रमुख हेतू असतो. समाजरचना ही समाजसंस्थांच्या परस्परसंबंधांतून निर्माण होते. त्यामुळे त्यांचेही विश्लेषण करणे तेवढेच आवश्यक असते. या संदर्भात समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी पार्सन्झ यांनी सुचविलेल्या कमश्रेणीचा फार उपयोग होतो. नियुक्त कार्यभूमिका ( रोल ) व स्थान ( स्टेटस ) या दोन कल्पना या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या ठरतात. समाजातील प्रचलित मूल्यांमुळे व्यक्ती व समष्टी यांच्या संबंधांविषयी योग्यायोग्य, संमत असंमत अशा प्रकारच्या कल्पना प्रस्थापित होतात. मूल्ये, अपेक्षित वर्तन, समष्टी व नियुक्त कार्यभूमिका ही जी श्रेणी कल्पिलेली आहे, तिच्यामुळे सामाजिक मूल्ये व व्यक्तींचे वर्तन यांची सांगड घालणे सोपे जाते. व्यक्तीचे वर्तन व अन्योन्य संबंध हेसुद्धा पुष्कळ अंशांनी सामाजिक संस्थांमुळे सुनियंत्रित होतात.

मानवी समाज हा व्यक्तींचा बनलेला असला, तरी या व्यक्तिसमूहाला संस्कृती असते. व्यक्ती व समूह यांतील परस्परसंबंध हेसुद्धा संस्कृतीवर आधारलेले असतात. व्यक्ती व समाज यांच्या परस्परसंबंधांतून मूल्ये निर्माण होतात. त्याचे पालन करणे, हे त्या समूहातील व्यक्तींना आवश्यक ठरते. व्यक्तींच्या गरजा भागविण्यासाठी सामाजिक संस्थांची जरूरी भासते; मात्र व्यक्तींच्या परस्परसंबंधांवर व वर्तनावर नियंत्रण घालणे, हे सामाजिक संस्थांचे महत्त्वाचे कार्य होय. व्यक्तीच्या व समाजाच्या गरजानुसार सामाजिक संस्थाही अनेक प्रकारच्या असतात. या निरनिराळ्या संस्था एकत्र येऊन समाजरचना निर्माण होते. समाजशास्त्राचा अभ्यास करताना सामाजिक संस्था व समाजरचना यांचा संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन व विश्र्लेषण पद्धती लक्षात घ्यावयास पाहिजेत; कारण समाजशास्त्रज्ञांच्या मते संरचना-त्मक कार्यवादी पद्धतीने अभ्यास केल्यास, ते विवेचन जास्तीत जास्त वास्तववादी होईल.

solved 5
सामाजिक Tuesday 6th Dec 2022 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 5186 +22