संवाद कौशल्य महत्वाचे का आहे?www.marathihelp.com

संवाद कौशल्य महत्वाचे का आहे?

मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कुणी एकान्त प्रिय असला तरी तो बारा महिने चोवीस तास तसा राहू शकणार नाही. त्याच्या या वृत्तीमुळे कदाचित कुटुंबव्यवस्था तयार झाली असावी. कुणाशी तरी बोलावं, आपले विचार सांगावे ही आंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवामध्ये असते. अगदी तान्हं मूलही याला अपवाद नाही.

नव्या जगात आलेलं प्रत्येक बालक सुरुवातीला आपल्या गरजा पूर्ण करण्यात, करवून घेण्यात मशगूल असतं. गरजा पूर्ण करण्यासाठी आई आसपास असते. या निमित्तानं आईशी निर्माण होणाऱ्या जवळीकीनं बालकाच्या सामाजिक गरजेची पूर्तता होते. सुरुवातीला भाषिक संवाद नसतोच. आईच्या मिठीमधून ‘मला तू आवडतोस’ ही भावना पोचते. बालकाचं वय वाढतं तसं दुसऱ्या-तिसऱ्या वयातलं मूल बघणाऱ्याच्या नजरेला नजर मिळवतं, बोललेल्या शब्दांना हुंकारानं उत्तर देतं. ऐकलेसे शब्द व हुंकार या संवादातून मूल ऐकलेले शब्द उच्चारायला शिकतं. दोन ते अडीच वर्षे वयाचं मूल भोवतीच्या व्यक्तींशी शब्दांनी संवाद साधू लागतं.

खरं तर संवादाच्या व्याख्येमध्ये ‘चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, खुणा व बोललेली भाषा यांच्या माध्यमातून माहितीची दे‍वाण-घेवाण’ असं संमिलित असतं.

संवादामध्ये एक व्यक्ती बोलणारी व एक ऐकणारी अशा किमान दोघांची गरज असते. बोलणाऱ्या व्यक्तीनं बोललेले शब्द, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हावभाव हे कान व डोळे या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचवले जातात. या सगळ्या गोष्टींच्या समन्वयातून व ऐकणाऱ्याच्या आकलनक्षमतेनुसार ऐकणाऱ्याचा मेंदू अर्थ लावतो. बोलणाऱ्याची व ऐकणाऱ्याची भाषा, अनुभव, मानसिक परिस्थिती, भावनिक संतुलन यावर ऐकलेल्या शब्दाचं आकलन होत असतं.

बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणाऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीजवळ संवाद कौशल्याची गरज असते. बोलणाऱ्याजवळ ही कला नसेल तर बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणारा ऐकतो खरा, पण त्याचा योग्य अर्थ त्याच्यापर्यंत पोचत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि बोलणाऱ्याला ‘मला असं म्हणायचं नव्हतं’ असं बोलून क्षमा मागावी लागते.

जो उत्तम वक्ता असतो तो त्याला अपेक्षित असलेला संदेश सगळ्या श्रोत्यांपर्यंत तंतोतंत पोचविण्यात यशस्वी होत असतो. त्यानी सांगितलेल्या विनोदाला श्रोते हसून दाद देतात. एखादा विचार आवडला तर टाळ्या वाजवून प्रतिक्रिया देतात. अपेक्षित क्षणी बोललेल्या भाष्याला अपेक्षित प्रतिसाद मिळणं ही संवाद कौशल्याची पावती असते. चांगला वक्ता अशावेळी आपलं बोलणं योग्य वेळी थांबवतो व त्यावेळी अपेक्षित असलेला प्रतिसाद हंशा किंवा टाळ्या या स्वरूपात मिळतो.


व्याख्यात्यांचा कौशल्याचा वापर एका वेळी अनेक श्रोत्यांसाठी असतो. रोजच्या व्यवहारामध्ये घरी. नातेवाइकांमध्ये कार्यालयांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये, डॉक्टरांच्या दवाखान्यात, दुकानांमध्ये या संवाद कौशल्याचा उपयोग होत असतो. संवाद कौशल्य असेल तर माणसं भावनिकरित्या जोडली जातात. एखादा व्यावसायिक, एखादा डॉक्टर, एखादा विक्रेता यशस्वी होण्यामागे त्याच्यातील संवाद कौशल्याचा मोलाचा वाटा असतो.

संवाद कौशल्य हे जन्मजात नसतं, अनुवांशिकरित्याही मिळत नसतं. त्यासाठी घरचं पोषक वातावरण, शाळा-कॉलेजातील शिक्षकांचं मार्गदर्शन, संबंधित व्यक्तीचं वाचन, भाषेवरील प्रभुत्व, त्याचं आत्मभान, आत्मविश्वास, सहसंवेदना ही जीवन कौशल्ये या सगळ्या घटकांचं योगदान असतं.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 5903 +22