व्यक्तिस्वातंत्र्य विचारसरणीचा मुख्य उद्देश काय?www.marathihelp.com

व्यक्तिस्वातंत्र्य : आधुनिक उदारमतवादी आणि लोकशाही राजकीय विचारात व्यक्तिस्वातंत्र्यास महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुप्त असणाऱ्या गुणांचा आविष्कार करण्यासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते. स्वातंत्र्याच्या मदतीने व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे स्वत:चा विकास घडवून आणू शकते. व्यक्तीला मिळालेले स्वातंत्र्य आणि अधिकार हे तिला निसर्गत:च प्राप्त झालेले आहेत. स्वातंत्र्य नसेल तर स्वायत्त, स्वाभिमानी आणि आत्मप्रतिष्ठा जपणारी व्यक्ती समाजात निर्माण होणार नाही आणि अशा व्यक्ती जर समाजात नसतील, तर समाजाचाही फारसा विकास होणार नाही.

प्रख्यात ब्रिटिश विचारवंत ⇨ जॉन स्ट्युअर्ट मिल (१८०३–७३) यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार केला. व्यक्तिस्वातंत्र्यात त्यांनी विचार आणि चर्चास्वातंत्र्यास महत्त्वाचे स्थान दिले. विचारस्वातंत्र्याशिवाय आपणास सत्याचा शोध घेता येणार नाही आणि लोक ज्यास सत्य मानतात त्याची कठोर चिकित्सा करता येणार नाही, असे त्यांचे मत होते.

स्वातंत्र्यामध्ये सर्व प्रकारच्या बंधनांचा अभाव गृहीत धरलेला असला, तरी स्वातंत्र्य व्यक्तीला समाजात उपभोगायचे असते आणि प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याने मऱ्यादित केलेले असते. सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना व्यक्तीस समाजाची बंधने मानावी लागतात. व्यक्ती तिच्या घरी मद्य प्राशन करू शकते पण तीच व्यक्ती ज्यावेळी वाहतूक-नियंत्रक पोलीस म्हणून काम करावयास उभी राहते, त्यावेळी तिला मद्य घेता येणार नाही. कारण स्वातंत्र्यावर सार्वजनिक हिताची काही बंधने असतात ⇨ हॅरल्ड जे. लास्कीने हेच तत्त्व द राइझ ऑफ युरोपियन लिबरॅलिझममध्ये व्यक्त केले आहे.

मिलच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याचा अधिकार आहे. यात प्रसंगी त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते पण अशा प्रयोगांचा पुढे समाजास खूप उपयोग होतो कारण काही व्यक्ती समाजापेक्षा बऱ्याच पुढे गेलेल्या असतात.

प्रख्यात ब्रिटिश तत्त्वज्ञ ⇨ सर आयझेया बर्लिन (१९०९–९७) यांनी स्वातंत्र्याचे ‘नकारात्मक स्वातंत्र्य’ आणि ‘सकारात्मक स्वातंत्र्य’ असे दोन प्रकार सांगितले आहेत. त्यांच्या मते नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याच्या मार्गात निर्माण झालेले सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्याच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. नकारात्मक स्वातंत्र्य सर्वच व्यक्तींना उपलब्ध असते. सकारात्मक स्वातंत्र्याचा वापर प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता व कौशल्य यांवर आधारलेला असतो. नकरात्मक स्वातंत्र्य व्यक्तीस विकासाच्या संधी उपलब्ध करून देते, तर सकारात्मक स्वातंत्र्य व्यक्तीस क्रियाशील व प्रयोगशील बनवते. त्यामुळे काही तत्त्वज्ञांच्या मते सकरात्मक स्वातंत्र्य व्यक्तिविशिष्ट असते.

स्वातंत्र्य, अधिकार व न्याय या तीन संकल्पनांचे परस्परसंबंध महत्त्वाचे आहेत. सर्वसाधारणपणे स्वातंत्र्य व अधिकार हे शब्द जरी एकाच अर्थान वापरले जात असले, तरी त्यात फरक आहे. अधिकार हे प्रत्येक व्यक्तीस दिलेले असतात. अधिकार हे साधन असतात आणि या साधनांच्या साहाय्याने स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करावयाचे असते. न्यायाचा संबंध स्वातंत्र्याच्या योग्य व न्याय्य वाटपाच्या संदर्भात येतो कारण समाजाच्या सर्व थरांत स्वातंत्र्याचा अधिकार मिळणे गरजेचे आहे. जॉन रॉल्सने (१९२१– ) आपल्या न्यायाच्या सिद्धांतात मुख्यत: तीन तत्त्वे मांडली : (१) सर्व व्यक्तींना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. (२) समाजातील विषमतांचे अशा प्रकारे वाटप व्हावे, ज्यामुळे समाजातील अभावग्रस्त लोकांचा लाभ होईल आणि (३) ज्यावेळी पहिल्या दोन तत्त्वांत संघर्ष होईल, त्यावेळी पहिले तत्त्व जास्त महत्त्वाचे मानावे. रॉल्सने न्यायाचा विचार करीत असताना व्यक्तिस्वातंत्र्यास महत्त्व दिले आहे.

व्यक्तिस्वातंत्र्यात व्यक्तीच्या नागरी स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. नागरी स्वातंत्र्यात व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा समावेश होतो. त्यात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश होतो. नागरी स्वातंत्र्य व धार्मिक स्वातंत्र्य आजच्या स्वतंत्र व सुसंस्कृत लोकशाही समाजाचे अधिष्ठान आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात विचार आणि चर्चा-स्वातंत्र्याचा आणि धर्म-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीला तिला आवडणारी धार्मिक श्रद्धा व परपंरा पाळण्याचा हक्क त्यात मान्य करण्यात आला आहे. या स्वातंत्र्याच्या परिपूर्तीची साधने म्हणून मग राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे प्रकरण जोडण्यात आले आहे. [→ भारतीय संविधान].

व्यक्तिस्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना व्यक्तीचा वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय संस्थांशी संबंध येतो, कारण अनेक वेळा या संस्थांकडे राज्याने व्यक्तिस्वातंत्र्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिलेली असते. व्यक्तीस तिच्या स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त चांगला आविष्कार कसा करता येईल हे या संस्थांनी पाहणे गरजेचे आहे. त्यातूनच व्यक्तिस्वातंत्र्य जास्त अर्थपूर्ण बनेल.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 75 +22