विपणन म्हणजे काय विपणनाचे महत्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

विपणन :

(मार्केटिंग). वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्यांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक क्रिया. ‘विपणन’ या संकल्पनेचा अर्थ विपनन कार्याशी संबंधित घटकांना वेगवेगळ्या प्रकारे अभिप्रेत असतो. विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय. जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची वा सेवांची जाहिरात करणे, तर वाहतुकदारांच्या दृष्टीने वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, असा विपणनाचा अर्थ केला जातो.

विपणनाचे महत्त्व : शेती, उद्योग व सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये विपणनाचे महत्त्व असते. विकसित व विकसनशील अशा दोन्ही देशांमध्ये विपणनाचे महत्त्व सारखेच असल्याचे दिसून येते. आर्थिक विकासाच्या संदर्भात विपणन कार्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून कारखानदार व उत्पादकसंस्था यांच्याकडून उत्पादित वस्तू योग्य अशा बाजारपेठेमध्ये, योग्य वेळी व योग्य प्रमाणात पोहोचविल्या जातात. विपणनव्यवस्थेच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजांचे स्वरूप व परिणाम आणि उत्पादित वस्तूंचे स्वरूप व त्यांचे परिणाम यांमध्ये सामंजस्य निर्माण करता येते. विपणनव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर विपणन-परिव्यय, वस्तूंची बाजारातील किंमत आणि पर्यायाने ग्राहकांना मिळणारे समाधान अवलंबून असते. विपणनव्यवस्था ही उपक्रमशील कारखानदार, व्यवस्थापक व समाज यांना जोडणारा दुवा असून समाजाची संपन्नता अवलंबून असते. शेतकऱ्यांनी तसेच कारखानदारांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य किंमत मिळणे व त्यामुळे उत्पादनात वाढ करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते. समाजातील क्रयशक्तीला योग्य दिशेने वळवून आर्थिक व्यवहारांची पातळी वाढविण्याला विपणनव्यवस्था कारणीभूत होऊ शकते. ही परिस्थिती उपक्रमशील उत्पादकांना अधिक संधी मिळवून देते व व्यवस्थापनाचे व्यवसायीकरण करण्यासाठी उपयुक्त होऊ शकते.

विपणनव्यवस्थेच्या माध्यमातून विविध गरजांची पूर्तता होत असते. ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार व आर्थिक कुवतीनुसार वस्तू मिळाल्याने त्यांची गरज तर भागतेच पण मुख्य म्हणजे त्यांना खरेदीचे समाधान प्राप्त होते. विस्तृत व कार्यक्षम विपणनव्यवस्थेमुळे ग्राहकांना वस्तूंचा मुबलक प्रमाणावर पुरवठा होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते व विपणनखर्चही त्यामुळे नियंत्रित करता येतो. विपणनामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू, वस्तूंचे विभिन्न उपयोग इत्यादींबद्दल माहिती मिळू शकते.

देशातील विपणनव्यवस्थेचा विकास झाल्यास शेती व औद्योगिक क्षेत्रांचा जलद विकास घडून येतो व त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो. विपणनव्यवहारांमध्ये गुंतलेल्यांना उपजीविकेचे साधन मिळते. अनेक स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. व्यवस्थापनतज्ञ पीटर ड्रकर (१९०९ – ) यांच्या मते विपणनव्यवस्थेमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचे अर्थकारणावर दूरगामी परिणाम घडून येत असल्याने, विपणन हे गुणकाची भूमिका पार पाडते, म्हणजेच झालेल्या गुंतवणुकीच्या अनेक पटींनी लाभ मिळतो. विपणनव्यवस्थेचा विकास झाल्यास देशातील उत्पादक संसाधनांचा आणि उत्पादनक्षमतेचा पूर्ण वापर होतो. विपणनामुळे सुप्त मागणीचे प्रभावी मागणीमध्ये परिवर्तन घडून येते बाजारपेठांचा विस्तार होतो. नवीन बाजारपेठा शोधून त्या काबीज केल्या जातात. व्यापारसंवर्धनासाठी आवश्यक असलेली संरचना अस्तित्वात येते, उत्पादनाची पातळी व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे क्षेत्र यांमध्ये वाढ होते. विपणनव्यवस्थेचा विस्तार झाल्याने वाहतुकीच्या व दळणवळणाच्या सोयींचा विकास होतो. ग्रामीण भागातील सर्व खेडी बाजारपेठांशी जोडली जातात आणि तेथील नागरिकांना त्यांचया क्रयशक्तीप्रमाणे गरजा भागविता येतात. त्यांचे जीवनमान संपन्न होण्यास मदत होते. थोडक्यात, विकसित व विकसनशील अशा दोन्ही स्तरांवरील अर्थव्यवस्थेतील विकासप्रक्रियेत विपणनाची भूमिका महत्त्वाची असते.

विपणन कार्ये : क्लार्क अँड क्लार्क यांनी विपणनकार्याचे केलेले वर्गीकरण आता सर्वमान्य झालेले आहे. त्यांनी विनिमयाची कार्ये, वस्तु-पुरवठ्याची कार्ये आणि साहाय्यक कार्ये असे विपणनकार्याचे प्रमुख तीन विभाग पाडून, पुढे प्रत्येक कार्यात कोणत्या दुय्यम कार्याचा समावेश होतो, हे स्पष्ट केलेले आहे. विनिमयकार्यात प्रामुख्याने विक्री व खरेदी यांचा समावेश होतो. संभाव्य ग्राहकाचे मन वळवून त्यांनी विशिष्ट वस्तूची खरेदी करावी, ह्यासाठी विविध पातळ्यांवर करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा विक्रीकार्यामध्ये समावेश होतो. विक्रीकार्यात वस्तू-नियोजन व विकास, संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्याची क्रिया, मागणीची निर्मिती, विक्री कराराच्या अटी व त्या प्रत्यक्षात आणण्याच्या क्रिया विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. विपणन व्यवस्थापनाचा जो भाग वस्तूंची विक्री परिणामकारकपणे घडवून आणण्याच्या प्रयत्नांशी असतो, त्याला ‘विक्रीव्यवस्थापन’ असे म्हणतात. विक्रिव्यवस्थापनाला आपले विक्रीधोरण ठरवावे लागते व तदनुसार विक्रीचे इष्टांक साध्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना ‘विक्रीनियोजन’ असे म्हणतात. यात प्रामुख्याने विक्रीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यापक कार्यक्रमांची आखणी करणे, कार्यप्रणाली निश्चित करणे, विक्रीसंघटनेच्या प्रत्येक घटकांचे कार्य ठरविणे आणि या सर्व घटकांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे ह्या बाबींचा समावेश होतो. विक्री-नियोजनाचे यश बऱ्याच अंशी विक्री-नियंत्रणावर अवलंबून असते. विपणनविषयक धोरणे व विक्रीयोजना कार्यान्वित करण्यासाठी अहवालाद्वारे तसेच सांख्यिकीय विश्लेषण, पत्रव्यवहार आणि व्यक्तिगत संपर्काच्या माध्यमाने पर्यवेक्षण करण्याच्या पद्धतीला ‘विक्री-नियंत्रण’ असे म्हटले जाते. विक्री-नियंत्रणामध्ये पूर्वनिर्धारित प्रमाणांच्या आधारावर विक्रीकार्याचे मूल्यांकन करण्यासाठी होणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 8214 +22