वर्तनवादी विचारवंत कोण आहे?www.marathihelp.com

वर्तनवाद :

एक आधुनिक मानसशास्त्रीय संप्रदाय. प्रगतिशील भौतिक शास्त्रांमध्ये मानसशास्त्राचा अंतर्भाव व्हावयास हवा असेल, तर ह्या शास्त्राला विशुद्ध वैज्ञानिक स्वरूप दिले पाहिजे, असे वर्तनवाद मानतो. अंतर्निरीक्षणावर (इंट्रॉस्पेक्शन) आधारलेली मानसशास्त्राची अभ्यासपद्धती ही सदोष आणि अविश्वसनीय आहे. तिच्यामध्ये वस्तुनिष्ठता नाही. तिच्यापासून काटेकोर निष्कर्ष लाभत नाहीत. अंतर्निरीक्षणपद्धती अपरिहार्य आहे, असेही मानण्याचे कारण नाही कारण ⇨ तुलनात्मक मानसशास्त्रात (प्राणिमानसशास्त्रात) तिचा वापर न करताही संशोधन करता येते.अंतर्निरीक्षणपद्धतीने आपणास मनाचे आकलन होऊ शकते जाणिवेच्या अवस्था ज्ञात होतात, असे मानले जाते. परंतु वर्तनवाद्यांच्या मते मन, जाणीव ह्यांसारख्या अमूर्त गोष्टी वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने उचित नाहीत.त्यांची सुनिश्चित व्याख्या करता येत नाही. त्या एका वेळी अनेक निरीक्षकांना प्रतीत होत नाहीत. त्या एक मनुष्य दुसऱ्याला दाखवू शकत नाही. त्या निरीक्षणार्थ प्रयोगशाळेतल्या काचपात्रात ठेवता येत नाहीत. त्यांच्यावर प्रयोगोचित नियंत्रण ठेवता येत नाही. साहजिकच मनोव्यंजक, जाणीवसूचक अशा मानसशास्त्रातल्या संज्ञा वर्तनवादास मंजूर नाहीत.


विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨जॉन ब्रॉड्स वॉटसन (१८७८-१९५८) ह्याने १९०८ च्या सुमारास वर्तनवादी विचार व्यक्त करावयास सुरुवात केली. ‘सायकॉलॉजी ॲज ए बिहेव्हिअरिस्ट व्ह्यूज इट ’ ह्या १९१३ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात त्याने आपले वर्तनवादी विचार प्रथम मांडले. वॉटसन हाच ह्या वादाचा मूळ प्रणेता होय.

एकोणिसाव्या शतकात डार्विनच्या उत्क्रांतिवादाने जीवशास्त्रात आणि एकूण पश्चिमी विचारसरणीत क्रांती घडवून आणली. मानवेतर प्राण्यांकडे नव्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले. मनुष्यजीवन आणि प्राणिजीवन ह्यांतील काही साम्यस्थळे ध्यानात येऊ लागली. मनुष्येतर प्राण्यांच्या वर्तनात काही एका मर्यादेपर्यंत बुद्धी, शिक्षणक्षमता ह्यांसारखे मानवसदृश गुण असतात. तसेच मनुष्याच्या वर्तनात विकारवशता, सहजप्रवृत्तींचे प्राबल्य इ. पाशवी वैशिष्ट्ये असतात, हे प्रतीत होऊ लागले. मानवी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मनुष्येतर प्राणिजीवनाचा अभ्यास अत्यावश्यक आहे, ही गोष्ट स्पष्ट झाली.

वॉटसन हा तौलनिक मानसशास्त्राचा सखोल अभ्यासक होता. मानवेतर प्राणी आपल्या अनुभवांचे निवेदन करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्तनाचा अभ्यास अंतर्निरीक्षणाविना करावा लागतो. ⇨ थॉर्नडाइक (१८७४-१९४९), ⇨ पाव्हलॉव्ह (१८४९-१९३६) ह्यांसारख्या मानसशास्त्रज्ञांनी पशुवर्तनाच्या अभ्यासाची नवनवी तंत्रे शोधून काढली. मनुष्येतर प्राणिजीवनाचा अभ्यास जर अंतर्निरीक्षणावाचून, निव्वळ वस्तुनिष्ठ तंत्रांनी करता येत असेल, तर तसा तो मानवी जीवनाचाही का करता येऊ नये? ह्या भूमिकेतूनच वर्तनवाद जन्मास आला.

कोणतीही प्रतिक्रिया उद्दीपकावर अवलंबून असते. अमुक एक उद्दीपक परिस्थिती माहीत झाली असता कोणती प्रतिक्रिया घडून येईल किंवा अमुक एक प्रतिक्रिया घडली असता ती कोणत्या उद्दीपकामुळे घडून आली ते बिनचूक सांगता आले पाहिजे. त्यामुळे मानवी वर्तनाची विश्वसनीय भाकिते करणे आणि मानवी व्यवहारांचे नियंत्रण करणे शक्य होईल. त्यामुळे R = f (S) हे वर्तनवादाचे आधारसूत्र होय. प्रतिक्रिया उद्दीपकमूल्यांवर अवलंबून असतात, हा ह्या सूत्राचा अर्थ.

वेदन, संवेदन ही पदे जाणीवसूचक असल्यामुळे वर्तनवाद्यांना ती आक्षेपार्ह वाटत होती. ‘इच्छाशक्ती’सारख्या संज्ञेपेक्षा ‘प्रतिक्षेप’ ही संज्ञा अधिक विश्वासार्ह होय, असे वर्तनवादी म्हणत. शिक्षण, भावना, विचार ह्यांच्या वर्तनवाद्यांनी केलेल्या व्याख्याही लक्षणीय आहेत. वॉटसनच्या मते शारीरिक व्यवहाराच्या नव्या सवयी म्हणजे शिक्षण अंतरिंद्रियांच्या सवयी म्हणजे भावना आणि स्वरयंत्राच्या सवयी म्हणजे विचार होत. विचारप्रक्रियेमध्ये स्वरयंत्राचे सूक्ष्म कंपन अथवा ‘आवृत्त’ वर्तन होत असते. लहान मूल प्रत्येक कृती करीत असताना स्वतःशी बडबडत असते. ते जसजसे मोठे होते, तसतशी ही प्रवृत्ती कमी होते. त्याचे स्वगत भाषण अस्फुट तसेच अदृश्य होते. परंतु त्याचे स्वरयंत्र, ओठ, जीभ इत्यादींच्या हालचाली आवृत रीत्या होऊ लागतात.

वर्तनवाद्यांच्या दृष्टीने व्यक्तित्व म्हणजे व्यक्तीच्या उपयुक्त तसेच हानिकारक सवयींचा व प्रवृत्तींचा संघात होय. वॉटसनच्या मते व्यक्तित्व हे निश्चित शिक्षणसाध्य आहे. प्रयत्‍नांनी ते घडविता येते. साध्या जन्मजात प्रक्रियांपासून अभिसंधान पद्धतीने (कंडिशनिंग) ते घडविले जाते. त्याच्या जडणघडणीत सामाजिक-भौगोलिक आसमंतातल्या विविध उद्दीपकांचा प्रभाव पडलेला असतो.

अभिसंधानपद्धतीने व्यक्तीच्या सवयी रुजविता येतात, तशाच त्या नाहीशाही करता येतात. मानसशास्त्रीय तंत्रांच्या मदतीने मानवी व्यक्तित्वाला इष्ट ते वळण लावता येते. सारी माणसे जन्मतः समान असून कोणत्याही नवजात बालकाच्या उद्दीपन परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण ठेवता आल्यास त्याच्यात वाटेल त्या प्रकारच्या व्यक्तित्वाचा विकास करता येईल, असा आशावाद वर्तनवादाने प्रतिपादिला व ह्या आशावादास पाव्हलॉव्हच्या अभिसंधित प्रतिक्षेपाच्या संकल्पनेने दुजोरा दिला. भविष्यकाळात मानवाचे नीतिशास्त्र हे प्रयोगांकित होईल आणि वर्तनवादी मानसशास्त्र हे त्या नीतिशास्त्राचा पाया होईल, अशी वॉटसनला आशा वाटत होती.

वॉटसनच्या वर्तनवादी शिकवणुकीला अमेरिकेत अपूर्व प्रतिसाद मिळाला. कमालीची धिटाई, बंडखोर वृत्ती आणि स्वकर्तृत्वनिष्ठा हे वॉटसनच्या वर्तनवादाचे मौलिक गुणविशेष होते. मानवी दुःखांचा परिहार विज्ञाननिष्ठ मानसशास्त्राने होऊ शकेल, असा दृढ विश्वास त्याने प्रकट केला. त्या काळी उपलब्ध असलेले मौलिक मानसशास्त्रीय ज्ञान वर्तनवादाच्या परिभाषेत मांडण्याची स्तुत्य कामगिरी वॉटसनने केली व मनुष्यवर्तनास तसेच मनुष्येतर वर्तनास सारखीच लागू पडणारी मानसशास्त्राची नवी परिभाषा अस्तित्वात आली.

तथापि वर्तनवादावर टीकाही झाली. इंद्रियवेदने, भावना, विचार इ. गोष्टींचे वर्तनवादी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्‍न वॉटसनने केला. पण मुळात ह्या गोष्टी त्याने प्रमादशील मानलेल्या अंतर्निरीक्षणवादी मानसशास्त्राकडून मिळविल्या होत्या. इंद्रियवेदने, भावना, विचार ह्यांची वॉटसनने दिलेली स्पष्टीकरणे म्हणजे केवळ भाषांतराच्या कसरती होत, अशीही टीका झालेली आहे. जे मनोव्यापार जाणीवसूचक पदांनी व्यक्त केले जात, तेच शरीरविज्ञानाच्या परिभाषेत मांडण्याची ही धडपड होती. पण ह्या भाषांतराला खऱ्याखुऱ्या स्पष्टीकरणाची जागा घेता येत नाही. विशुद्ध विज्ञानाची महती वर्तनवादाने सांगितली. प्रत्यक्ष पुराव्यापलीकडे जायचे नाही, हा विज्ञानाचा दंडक आहे. पण वाटेल त्या मानवी अर्भकाच्या ठिकाणी वाटेल ते व्यक्तित्व निर्माण करता येते, हा दावा प्रत्यक्ष पुराव्यावर आधारलेला नव्हता.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 16:33 ( 1 year ago) 5 Answer 5172 +22