मानसशास्त्रीय प्रयोग म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रायोगिकमानसशास्त्र : मानसशास्त्रीय प्रश्नांचा अभ्यास करण्याची एक पद्धती. मानसशास्त्राची एक शाखा अशा अर्थानेही ही संज्ञा वापरली जात असे तथापि मानसशास्त्राच्या प्रत्येक शाखेत प्रयोगपद्धतीचा वापर होत असल्याने प्रायोगिक मानसशास्त्राची एक वेगळी शाखा आता वस्तुतः मानली जाऊ नये. तरीदेखील वेदन, संवेदन, प्रेरणा, अध्ययन हे प्रायोगिक मानसशास्त्राचे खास विषय आहेत. प्रयोगपद्धतीने मानसशास्त्रातील ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते सर्व विषय प्रायोगिक मानसशास्त्राचे अभ्यासविषय ठरतात आणि त्यांत वरील विषय प्रमुख आहेत.

मानसशास्त्रीयप्रयोगांचेस्वरूप : प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणातील निरीक्षण. मात्र इतर नैसर्गिक शास्त्रांशी तुलना करता मानसशास्त्रीय प्रयोगांतील नियंत्रण गुंतागुंतीचे असते. अगोदर जे सिद्ध झालेले आहे त्याचा पडताळा पाहणे किंवा नवे संबंध शोधून काढणे, ही इतर शास्त्रांतील प्रयोगांची उद्दिष्टे मानसशास्त्रीय प्रयोगांतही असतात.

मानसशास्त्रीय प्रयोगांत परिवर्त्यांचा (व्हेरिएबल्स) वापर व नियंत्रण करावे लागते. परिवर्त्य म्हणजे कोणतेही मूल्य धारण करू शकणारा गुण होय. ज्यांच्या वर्तनावर परिणाम घडण्याची शक्यता आहे, अशा परिवर्त्यांचाच मानसशास्त्रात विचार होतो.

परिवर्त्यांचे दोन मुख्य प्रकार असतात. ते म्हणजे स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्त्ये. स्वतंत्र परिवर्त्ये ही वर्तनातील कारण-घटक (ॲन्टिसीडेंट फॅक्टर्स) असतात. ज्या परिवर्त्यांचे मूल्य प्रयोगकर्ता स्वतंत्रपणे बंदलू शकतो, त्या परिवर्त्यांना स्वतंत्र परिवर्त्ये म्हणतात. या कारण-घटकांचे उद्दीपक घटक, व्यक्तिसापेक्ष घटक आणि मध्यगामी घटक असे तीन उपप्रकार असतात. याचा अर्थ असा, की व्यक्तीचे वर्तन बाह्य किंवा आंतरिक उद्दीपनाने व्यक्तिविशिष्ट वा मानवनिर्मित सामाजिक कारणांनी अथवा या दोहोंचे मिश्रण असलेल्या मध्यगामी घटकांनी बदलू शकते. बाह्य आणि आंतरिक घटकांत भौतिक घटक (तपमान, जागा, आर्द्रता इ.), जैविक घटक (शारीरिक प्रकृती, पचन, रुधिराभिसरण इत्यादींचा परिणाम), आनुवंशिक घटक (शरीराची ठेवण, आनुवंशिक रोग इ.) आणि कारक घटक (स्नायूंच्या कार्यातून निर्माण होणारे घटक) यांचा अंतर्भाव होतो. अवलंबी परिवर्त्ये ही मानवी व्यवहारातील कार्यघटक (कॉन्सिक्वेन्सेस) असतात. एखाद्या उद्दीपकास अनुसरून व्यक्ती अनेक तऱ्हेने कार्य करू शकते. उद्दीपकामुळे होणारी प्रतिक्रिया, उद्दीपकपरिस्थितीबाबत निर्णय, त्याबाबतचा अभिप्राय किंवा अभिवृत्ती, भावनिक बदल आणि संवेदनात्मक बदल हे सर्व कार्यघटकाचे प्रकार आहेत.

स्वतंत्र परिवर्त्ये आणि अवलंबी परिवर्त्ये यांच्यातील कार्यकारणभाव सिद्ध करणे, हा मानसशास्त्रीय प्रयोगाचा प्रमुख हेतू असतो. असा प्रयोग अनेक प्रकारांनी करता येतो. मानवाच्या किंवा प्राण्याच्या वर्तनातील विशिष्ट वर्तन घडून येण्यास कारणीभूत असणारा प्रत्येक स्वतंत्र बाह्य परिवर्त्य घेऊन त्यात पद्धतशीरपणे बदल घडवावयाचा आणि या बदलामुळे अवलंबी परिवर्त्यात कोणता बदल घडून येतो, याचा अभ्यास करावयाचा हा एक प्रकार होय. स्वतंत्र बाह्य परिवर्त्यात बदल न घडविता व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या आंतरिक अवस्थेत बदल घडवून आणून त्याचा वर्तनावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करणे हा दुसरा प्रकार. काही स्वतंत्र परिवर्त्यांची मूल्ये स्थिर ठेवून म्हणजेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवून एखाद्या किंवा काही स्वतंत्र परिवर्त्यांची मूल्ये पद्धतशीरपणे बदलून त्याचा वर्तनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे, हा तिसरा प्रकार होय. बहुतेक मानसशास्त्रीय प्रयोगांमध्ये तिसऱ्या प्रकाराचाच अधिकधिक उपयोग करावा लागतो.

मानवाचे वर्तन गुंतागुंतीचे असते. त्यामुळे एखादे वर्तन एकाच स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून नसते. म्हणूनच मानसशास्त्रीय प्रयोगाची सुरुवात करताना अभ्यासविषयाचा कार्यघटक किंवा अवलंबी परिवर्त्य हा कोणत्या स्वतंत्र परिवर्त्यांवर किंवा कारणघटकांवर अवलंबून असेल, याचा प्रथम विचार करावा लागतो. त्यांपैकी नेमक्या कोणत्या स्वतंत्र परिवर्त्याचा अवलंबी परिवर्त्याबरोबरचा कार्यकारणसंबंध शोधून काढावयाचा, हे प्रयोगाचे उद्दिष्ट असते. प्रयोगामध्ये त्या स्वतंत्र परिवर्त्याशिवाय इतर स्वतंत्र परिवर्त्यांच्या मूल्यांवर नियंत्रण ठेवणे जरूर असते. समजा क्ष हा अवलंबी परिवर्त्य अ, ब, क, ड या स्वतंत्र परिवर्त्यांवर अवलंबून आहे आणि आपणास क्ष आणि अ मधील कार्यकारणसंबंध शोधून काढावयाचा आहे तर अशा प्रयोगात ब, क, ड या स्वतंत्र परिवर्त्यांची मूल्ये स्थिर ठेवून, म्हणजेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवून प्रयोगकर्ता अ ची मूल्ये बदलतो त्याप्रमाणे क्ष ची मूल्ये कशी बदलतात याचे निरीक्षण करतो तसेच क्ष आणि अ यांच्यातील कार्यकारणसंबंध निश्चित करतो. काही स्वतंत्र परिवर्त्यांचा मूल्ये बदलून प्रयोगात अभ्यास करावयाचा असतो व काहींची मूल्ये प्रयोगात स्थिर ठेवावयाची असतात, हे दोन्ही साधण्यासाठी मानसशास्त्रीय प्रयोगात ‘नियंत्रित समूह’ व प्रायोगिक समूह’ वापरतात. ज्या व्यक्त्तीच्या अथवा समूहाच्या बाबतीत अभ्यास करावयाच्या स्वतंत्र परिवर्त्याची मूल्ये बदलून अवलंबी परिवर्त्याची मूल्ये कशी बदलतात याचे निरीक्षण करावयाचे असते, त्या समूहास प्रायोगिक समूह म्हणतात.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 419 +22