मराठीतील श्रेष्ठ प्रतिभावंत संतकवी म्हणून कोण परिचित आहे?www.marathihelp.com

महासंत ज्ञानेश्वर : वारकरी संप्रदायातील पहिलेच व सर्वश्रेष्ठ संत म्हणजे ⇨ज्ञानेश्वर (१२७५-१२९६). ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६). ज्ञानदेव, त्यांचे जीवन, वाङ्मय आणि व्यक्तिमत्व हे सारेच केवळ लोकोत्तर आहे.

महासंत ज्ञानेश्वर : वारकरी संप्रदायातील पहिलेच व सर्वश्रेष्ठ संत म्हणजे ⇨ज्ञानेश्वर (१२७५-१२९६). ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६). ज्ञानदेव, त्यांचे जीवन, वाङ्मय आणि व्यक्तिमत्व हे सारेच केवळ लोकोत्तर आहे. ज्ञानदेवांच्या चरित्राबद्दल अनेक वाद आहेत. त्यांतील वाङ्मयाशी संबंधित असा महत्वाचा वाद म्हणजे गीतेवर टीका लिहिणारे ज्ञानेश्वर आणि अभंगरचना करणारे ज्ञानेश्वर या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात, हा होय. या वादाचा अखेरचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र ज्ञानदेवांच्या नावावरील बरेच अभंग त्यांचे नसावेत. भावार्थदीपिका ऊर्फ⇨ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेवपासष्टी आणि काही अभंग एवढी रचना निर्विवादपणे ज्ञानदेवांची आहे. त्याशिवाय उत्तरगीत, प्राकृतगीता, पंचीकरण, शुकाष्टक, योगवसिष्ठ अशी सु. पंचवीस प्रकरणे ज्ञानदेवांची म्हणून सांगितली जातात, पण अंतर्गत पुराव्यांवरून असे म्हणता येते, की ही रचना ज्ञानदेवांची नाही.

भावार्थदीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका आहे. ओवीसंख्या सु. नऊ हजार आहे. या ग्रंथाच्या संहितेचा प्रश्नही अद्याप निकालात निघालेला नाही. त्याची रचना नेवासे येथी झाली, हा उल्लेख त्या ग्रंथातच आहे. पुढे त्यात अनेक अपपाठ शिरले म्हणून एकनाथांनी त्याची शुद्ध प्रत तयार केली (१५८४). या ग्रंथाची एकनाथपूर्व-कालातील विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. ज्ञानदेवांनी आपली टीका रुक्ष शास्त्रीय पद्धतीने लिहिलेली नाही. तत्त्वज्ञानातील सिद्धांत ते उत्तम प्रकारे जाणतात आणि त्यांनी भाष्यकारांना वाटही पुसली आहे पण आपली टीका त्यांनी तर्ककर्कश होऊ दिलेली नाही. ही टीका म्हणजे मराठी साहित्याचे एक अनमोल लेणे आहे. आपल्या सौंदऱ्याने ती रसिकाला वेड लावते, नास्तिकालाही तिच्या रमणीयतेचा वेध लागतो. यातील ओवी छोटी व नेटकी आहे, शब्दयोजना नेमकी व चातुर्यपूर्ण आहे, त्यामध्ये काव्य आणि तत्वज्ञान ही केवळ एकरूप होऊन गेली आहेत. अध्यात्मातील सिद्धांताबाबत ज्ञानदेवांची वृत्ती अनाग्रही आहे. नाथपंथातील अद्वयसिद्धांताचा व हठयोगातीली कुंडलिनीजागृतींचा मोठाच ठसा त्यांच्यावर आहे, पण त्यांची दृष्टी समन्वयाची आहे. ज्ञान आणि कर्म, कर्म आणि संन्यास, संन्यास आणि भक्ती, भक्ती आणि अद्वैत, अद्वैत आणि योग, योग आणि वेदान्त अशी अनेक द्वंव्दे येथे निर्द्वंव्दात पोहोचली आहेत. यथील तत्वज्ञानविचार जितका सुबोध तितकाच रमणीय आहे. येथे अतींद्रिय अध्यात्म साक्षात अनुभवाचे इंद्रियोगचर रूप धारण करून उभे राहिले आहे. आपली ही टीका शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील हा आपला उदगार ज्ञानदेवांनी सार्थ करून दाखवला आहे. त्यांचा हा ग्रंथ शांतरसाचा उत्कृष्ट आविष्कार आहे. यातील सरस प्रास्ताविके, उचित उपसंहार, वेधक शब्दचित्रे, समर्पक उपमादृष्टांत, मराठी भाषेविषयीचे प्रेम, गाढ तत्वज्ञानविचार, अद्वैतानुभवाची प्रत्ययकारी वर्णने, विनय आणि आत्मविश्वास यांचे मधुर मीलन, ज्ञानदेवांच्या उदात्त व्यक्तिमत्वाचे मनोहर दर्शन, त्यांची आध्यात्मिकता व सर्वसामान्यांविषयीची करुणा यांपैकी कोणते वैशिष्ट्य अधिक श्रेष्ठ मानावे याचा संभ्रम पडावा अशी ही एक अनन्यसाधारण साहित्यकृती आहे. साहित्याचा हा एक तेजस्वी मानदंड मराठी सारस्वताच्या प्रारंभकालात उभा ठाकला आहे आणि पुढच्या काळातील अनेक श्रेष्ठ संतकवींनी याच्या प्रकाशात वाटचाल करण्यात धन्यता मानली आहे.

अद्वैताचा अनुभव हाच ज्याचा एकमेव विषय आहे, असा अमृतानुभव हा सु. आठशे ओव्यांचा स्वतंत्र ग्रंथ (हा अनुभवामृत ह्या नावानेही ओळखला जातो.) आपले गुरू श्रीनिवृत्तिनाथ यांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेनंतर लिहिला. काव्य आणि तत्वज्ञान या दोन्हीं दृष्टींनी हा ज्ञानेश्वरीच्याही वरची पातळी गाठतो असा रसिकांचा व तत्ववेत्त्यांचा अभिप्राय आहे. योगी चांगदेवांनी कोरे पत्र पाठवले, त्याला उत्तर देण्याच्या निमित्ताने पासष्ट ओव्यांचे एक अद्वैतानुभूतिपर काव्य ज्ञानदेवांनी लिहिले, ते चांगदेवपासष्टी म्हणून प्रसिद्ध आहे. अथांग आकाशाचे छोटेसे प्रतिबिंब एखाद्या लहानशा जलाशयात पडलेले दिसावे व त्याचा आपल्या मनाला त्या बिंबरूप आकाशाहूनही अधिक मोह पडावा, तशी या चांगदेवपासष्टीतील आविष्काराची गुणवत्ता आहे. विठ्ठलसंप्रदायाशी संपर्क आल्यावर ज्ञानदेवांनी अभंग लिहिले असावेत. त्यांच्या नावावरील बऱ्याकच अभंगांचे कर्तृत्व संशयित आहे. तथापि काही अभंगांतून ज्ञानदेवांच्या अनुभवाची उत्कटता व रचनेची कोवळीक आढळते. योगपर व आत्मानुभवपर अभंग, गौळणी आणि विराण्या यांत ते विशेषत्वाने जाणवते. त्यातील हरिपाठाचे अभंग हा छोटा गट वारकऱ्याणच्या नित्यपाठात आहे. एवढी अलौकीक रचना ज्ञानदेवांनी केवळ एकवीस-बावीस वर्षाच्या आयुष्यात केली हा देखील एक चमत्कारच.जगाच्या वाङ्मयातही असे उदाहरण अपवादानेच असावे. वारकरी संप्रदायात ज्ञानदेवांना ‘माउली’ मानतात. ज्ञानेश्वरी हा त्या पंथाचा जणू धर्मग्रंथच आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या शब्दांमध्ये त्यांचे भागवतधर्मातील कार्य वर्णिले जाते. मराठी साहित्याच्या संदर्भातही ते उदगार सार्थ आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:20 ( 1 year ago) 5 Answer 5421 +22