भारतात किती टक्के शेतकरी सेंद्रिय शेती करतात?www.marathihelp.com

सेंद्रिय उत्पादनात भारताचा वाटा 30 टक्के आहे.
भारतात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनापैकी 30 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे.

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत सर्वात प्रथम आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या स्थानावर आहे. सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते. पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य आहे. आता त्यापाठोपाठ त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांनी आपल्या क्षेत्रात संपूर्णपणे सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ईशान्य भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. या भागात रासायनिक खतांचा वापर इतर देशांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी करतात. त्याचबरोबर आदिवासी आणि इतर लहान लहान बेटांवरही सेंद्रिय शेती करण्यात येत आहे.

सेंद्रिय उत्पादनांना मोबादला खूप चांगला मिळतो. त्यामुळे अशा पद्धतीने शेती व्यवसाय करण्याकडे आता कल निर्माण झाला आहे. यासाठी दोन योजना तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन (MOVCD) आणि परंपरागत कृषी विकास योजना (पीकेव्हीवाय). या योजना सन 2015 मध्ये सुरू करण्यात आल्या. रसायनमुक्त शेती व्यवसाय करणे, या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी या दोन्ही योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्याच्याच जोडीला कृषी निर्यात धोरण 2018,तयार करण्यात आल्यामुळे सेंद्रिय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत खूप चांगली मागणी निर्माण होऊ लागली. जागतिक सेंद्रिय बाजारपेठेत भारत एक महत्वाचा भागीदार म्हणून उदयास येऊ शकेल, असा विश्वास आता निर्माण झाला आहे. भारताने सन 2018-2019 मध्ये 5,151 कोटींची सेंद्रिय कृषी उत्पादनाची निर्यात केली आहे. या निर्यातीमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने अंबाडीचे बी म्हणजे जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी यांचा समावेश आहे.

परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये सुमारे 40,000 क्लस्टर्स विकसित करण्यात आले असून त्यामध्ये 7 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. एमओव्हीसीडीअंतर्गत 160 कृषी उत्पादन संघटनांच्या माध्यमातून 80 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. हे सर्व शाश्वत क्लस्टर्स ठरावेत यासाठी बाजारपेठेतल्या मागणीचा विचार करून उत्पादनाच्या कराराची पद्धती स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनाला तयार बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तसेच गरजेनुसार उद्योजकांना योग्य गुणवत्तेचे उत्पादन मिळण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणा-या शेतकरी बांधवांचे पीक मोठे उद्योजक घेत आहेत. यामध्ये वनस्पतींचा अर्क काढणा-या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन खरेदी करणे परवडते. यामध्ये आले, हळद, काळे तांदूळ, मसाले, पोषक तृणधान्य, अननस, औषधी वनस्पती, गव्हाचे तृण, बांबूचे कोवळे कोंब, इत्यादींचा पुरवठा उद्योगांना करण्यात येत आहे. मेघालयातून मदर डेअरी, रेवांता अन्न आणि मणिपुरातून बिग बास्केट या कंपन्यांना सेंद्रिय उत्पादने पुरवली जातात. सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करणे, तसेच थेट विक्री करणे यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये काम केले जात आहे. त्यामुळे लोकांना आपल्या दारामध्ये ताजी सेंद्रिय उत्पादने मिळू लागली आहेत.

ज्या शहरी भागांमध्ये सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी मध्यस्थ नसतो. तिथे दलाली वाचते. आणि शेतकरी बांधवांना चांगली किंमत मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पादन संघाच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत फळे आणि भाजीपाला आॅनलाइन विकला जात आहे. तसेच पंजाबमध्ये विशेष प्रकारे तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व्हॅनच्या माध्यमातून लोकांना घरपोच सेंद्रिय उत्पादने मिळत आहेत.

नैसर्गिक शेती ही काही भारतामध्ये नवीन संकल्पना नाही. शेती करताना रसायनांचा वापर अजिबात न करता शेती करण्याची पद्धत आपल्याकडे अतिशय प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. यासाठी शेतीचे सेंद्रिय अवशेष, गाईचे शेण, पालापाचोळा कुजवून तयार करण्यात आलेले खत, यांचा वापर शेतीमध्ये केला जातो.

याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उत्पादन केले जावू शकते. अलिकडच्या काळात सेंद्रिय शेतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ते पाहता जागतिक सेंद्रिय कृषी व्यापारामध्ये लवकरच भारताचे स्थान अधिकाधिक बळकट होण्याची शक्यता आहे.

solved 5
कृषि Monday 5th Dec 2022 : 15:53 ( 1 year ago) 5 Answer 4372 +22