भारताचे सातवे पंतप्रधान कोण होते?www.marathihelp.com

राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१ ) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते.

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.

राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.

इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.

राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

solved 5
General Knowledge Monday 17th Oct 2022 : 07:30 ( 1 year ago) 5 Answer 1081 +22