ब्रेन म्हणजे काय?www.marathihelp.com

ब्रेन (मेंदू) म्हणजे काय?

मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्याच सहयोगी पेशी असतात. मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन १,३००-१,४०० ग्रॅ. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सु. २% असते. पुरुषाच्या मेंदूचे आकारमान सु. १,२६० घसेंमी., तर स्त्रीच्या सु. १,१३० घसेंमी. असते. अन्य सस्तन प्राण्यांची तुलना केल्यास असे दिसून येते की मानवी मेंदू आकारमानाने आणि वजनाने चिंपँझीच्या मेंदूच्या तिप्पट असतो. हत्तीच्या मेंदूचे वजन सु. ५ किग्रॅ. असते. या लेखात प्रौढ मानवी मेंदूसंबंधी माहिती दिलेली आहे.


मेंदूचे कार्य :

मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात. जसे चालणे, बोलणे आणि हातपायांच्या हालचाली. हालचालींसाठी मेंदूपासून चेतापेशींमार्फत निघालेले आवेग हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेताकडे वाहून नेले जातात. तसेच डोळे, तोंड, चेहरा यांच्या हालचाली थेट मेंदूपासून निघालेल्या कर्पर चेता नियंत्रित करतात. प्रेरक बाह्यांग शरीराच्या सर्व हालचालींचे उगमकेंद्र असून त्यात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या हालचालींची क्षेत्रे असतात. प्रेरक बाह्यांगापासून निघालेले आवेग बाह्यांग मेरु चेता मार्गातून मस्तिष्क पुच्छात येतात. हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे विद्युत संदेशाच्या स्वरूपात जातात. मस्तिष्क पुच्छातील चेतापेशींपासून मेरुरज्जूतील प्रेरक चेतापेशींद्वारे आवेग स्नायूंपर्यंत येतात. प्रेरक चेतापेशी आणि स्नायूतंतू यांच्या संपर्कस्थानी चेतापेशी ॲसिटिलकोलीन हे रसायन स्रवते. त्याद्वारे आवेग स्नायूतंतूंकडे पोहोचतात आणि स्नायूंचे आकुंचन घडवून आणतात. या आकुंचनाच्या परिणामी शरीराच्या हालचाली घडतात (पहा : कु.वि. भाग – २ चेतासंस्था). अनुमस्तिष्क आणि तल गंडिका स्नायूंच्या गुंतागुंतीच्या हालचालींमध्ये समन्वय राखतात.

संवेदी चेतासंस्था ही चेतासंस्थेचा एक भाग असून तिच्याद्वारे संवेदी माहितीचे ग्रहण आणि संस्करण केले जाते. ही माहिती कर्पर चेतांमधून तसेच मेरुरज्जूच्या चेता मार्गामधून येते. दृष्टी, गंध, श्रवण, स्पर्श, रुची आणि तोल असे खास संवेद ओळखण्याचे आणि त्यांपासून मिळालेल्या माहितीच्या संस्करणाचे कार्य मेंदू करतो.

शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून येणाऱ्या संवेदनांची क्षेत्रे संवेदी बाह्यांगात असतात. संवेदी बाह्यांगाचे एक क्षेत्र कायासंवेदी बाह्यांग असते. त्वचेतील संवेदी ग्राही पेशींद्वारे स्पर्श, दाब, वेदना, कंपने, तापमान यांच्या संवेदनांचे रूपांतर चेता संदेशात केले जाते आणि ते संदेश मेरुरज्जूतील चेतापेशींद्वारे कायासंवेदी बाह्यांगाकडे नेले जातात. तसेच सांध्यांच्या स्थितीबद्दलची माहिती सांध्यांपासून या बाह्यांगाकडे पोहोचते. सूक्ष्म/हळूवार स्पर्श, कंपने, सांध्यांची स्थिती यांसंबंधी माहिती वाहून नेण्यासाठी खास संवेदी मार्ग असतो. आणखी एका वेगळ्या मार्गाद्वारे वेदना, तापमान, स्थूल/जोरदार स्पर्श यांबाबतची माहिती वाहून नेली जाते.

डोळ्यांतील दृष्टीपटलावर प्रकाश पडणे हा दृष्टी ज्ञानाचा पहिला टप्पा असतो. दृष्टीपटलातील प्रकाशग्राही पेशी प्रकाशीय संवेदांचे रूपांतर विद्युत चेता संदेशात करतात. हे संदेश दृष्टीपटलाला जोडलेल्या दृष्टीचेताद्वारे पश्चकरोटी पालीतील दृक्‌ बाह्यांगाकडे पाठवितात.

ऐकणे आणि शरीराचा तोल सांभाळणे या क्रियांची सुरुवात आंतरकर्णापासून होते. तोल सांभाळताना आंतरकर्णातील अंतर्लसीका द्रवाची हालचाल होते, तर आवाजामुळे अस्थिकेद्वारे कंपने निर्माण होतात. त्यामुळे चेता संदेश निर्माण होतात आणि ते श्रवण-प्रघाण चेताद्वारे श्रवण बाह्यांगाकडे वाहून नेले जातात.

गंधाची जाणीव नासा गुहिकेतील ग्राही पेशींद्वारे होते. ही माहिती घ्राण चेताद्वारे घ्राण कंदाकडे आणि तेथून घ्राण बाह्यांगाकडे नेली जाते. रुचीची जाणीव जीभेच्या ग्राही पेशींपासून होते. ही माहिती आननी चेता आणि जिव्हाग्रसनी चेता यांच्याद्वारे मस्तिष्क स्तंभाकडे जाते. तेथून ती चेतकामार्फत रुची बाह्यांगाकडे पोहोचते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 5136 +22