दिल्लीवर राज्य करणारी गुलाम काळातील पहिली स्त्री कोण होती?www.marathihelp.com

दिल्लीच्या तख्तावर अधिराज्य गाजवणारी एकमेव महिला शासक रझिया सुलतान.

भारताच्या इतिहासात किती तरी चांगले शासक होऊन गेल्याचे दाखले मिळतात. राजा सतकर्णी पासून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजापर्यंत असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी पराक्रम तर गाजवलाच पण, जनतेचे कल्याण आणि त्यांचे हित हेच मध्यवर्ती लक्ष्य ठेवून राज्यकारभार केला.

या सम्राटांच्या यादीत काही शूर महाराण्या देखील होऊन गेल्या. “मेरी झांसी नाही दुंगी..” असे म्हणत इंग्रजांच्या बेबंदशाहीला ललकरणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई तर आपल्या सर्वांच्या परिचायाची आहेच. पण, झाशीच्या राणीच्या कार्यकाळापूर्वी एक राणी अशी ही होऊन गेली जिने, दिल्लीच्या तख्तावर आपले अधिराज्य गाजवले.

खरे तर या राणीने स्वतःला कधी ‘राणी‘ ही बिरुदावली लावलीच नाही. राणी म्हणजे तर राज्याची बायको. तिचा अधिकार तिथपर्यंतच मर्यादित आहे. पण, या सम्राज्ञीला स्वतःला “सुलतान‘ म्हणवून घेणे जास्त योग्य आणि समर्पक वाटत होते.

अर्थातच, तिचे धैर्य, शौर्य, राज्य चालवण्यासाठी आवश्यक असणारे प्रशासकीय ज्ञान आणि त्यासोबतच लागणारे व्यवहार चातुर्य या सगळ्या आघाड्यांवर ती तरबेज होती.

अगदी लहानवयापासूनच तिला लढाईचे आवश्यक ते प्रशिक्षण आणि राज्य चालवण्यासाठी आवश्यक ते प्रशासकीय कामकाजाचे तंत्र शिकवण्यात आले होते.

राज्याची सुलतान म्हणून कित्येक लढाईत ती स्वतः हत्तीवर बसून युद्धाचे नेतृत्व करीत असे. दिल्लीच्या तख्तावर आपली अधिसत्ता गाजवण्यासाठी तिला फक्त चार वर्षांचाच अवधी मिळाला. मात्र, या चार वर्षातही तिने इतके काम केले आहे की, चार हजार वर्षे तिचे यासाठी स्मरण केले जाईल. या साम्राज्ञीचे नांव होते,’ ‘रझिया सुलतान’.

रझिया सुलतान भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची स्त्री मुस्लिम शासक होती. तिने १२३६ ते १२४० यादरम्यान दिल्लीवर आपली हुकुमत गाजवली. ती स्वतःला सुलतान म्हणवून घेत असे, तिच्यापुर्वी कोणत्याही स्त्रीला ही बिरुदावली मिळाली नव्हती.

१० नोव्हेंबर १२३६ मध्ये ती जलालत-उद-दिन रझिया या नावानेच सत्तेत आली. सत्ता ग्रहण करताच तिने स्त्रियांप्रमाणे पारंपारिक वेश झुगारून ती पुरुष शासकांप्रमाणेच वेशभूषा करू लागली.

कट्टरपंथी आणि संकुचित वृत्तीच्या मुस्लिमांना एका स्त्रीने राज्यकारभार करणे मान्य नव्हते.

रझियाला ‘सुलताना’ म्हणवून घेणे कदापीही पसंत नव्हते. सुलताना ही बिरुदावली तर सुलतानच्या पत्नीला किंवा रखेलीला दिली जाते. ती कोणाची पत्नी किंवा रखेल नाही तर स्वतंत्र शासक होती. म्हणून ती स्वतःला ‘सुलतान’ हीच बिरुदावली लावत असे.

रझिया कोणत्याही राजघराण्याशी किंवा सरदार वंशाशी संबधित नव्हती. उलट, तिचा वंश तुर्किश सेल्जूक गुलामांशी जोडलेला होता. तिच्या सत्तेने समाजातील वर्ग-लिंग भेदाधारीत सत्तेच्या रचने पुढेच एक मोठे आव्हान उभे केले.
कुतुब अल-दिन ऐबकच्या राजवटीत तिचे वडील गुलाम म्हणून दिल्लीत आले.

ऐबकने मामलुक सत्तेचा पाया घातला. एकेक पायरी चढत शेवटी त्यांनी स्वतः दिल्लीची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. आपल्या इतर मुलांसोबत त्यांनी रझियालाही लढाईचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. रझियाची वाढ एखाद्या मुलीप्रमाणे नाही तर मुलाप्रमाणे होईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

त्यामुळे स्त्रियांमध्ये मूलतः असणारी भित्री आणि दुर्बलवृत्ती तिच्यात कधी उतरलीच नाही. स्त्रियांसाठी असलेले नियम तिच्यावर कधीच लादण्यात आले नाहीत. यासाठी तिच्या कुटुंबातील इतर स्त्रियांशी तिचा जास्त संपर्क होऊ दिला जात नसे.

आपल्या इतर मुलांपेक्षा रझिया जास्त चाणाक्ष आणि कुशल आहे, हे तिचे वडील इल्तुत्मिशयांच्या लक्षात आले. म्हणून आपल्या नंतर आपल्या साम्राज्याचा कारभार त्यांनी रझियाच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. आपला वारसदार म्हणून त्यांनी राझियाचीच निवड केली.

तिच्या वडिलांनीच तिच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता, तरीही सत्तेच्या सोपानापर्यंतचा रझियाचा रस्ता तितकासा सुकर नव्हता. तिच्या राज्यातील सरदारांनी एका स्त्रीने गादिवर बसण्याच्या विरोध केला. सरदारांच्या पाठींब्याने राझियाचा भाऊ रुख-उद-दिन फिरुझ याने सत्ता काबीज केली.

पण, फिरुझ राज्याचा कामकाजात लक्ष न घालता, तो छानछोकीचे आरामदायी जीवन जगण्यातच मश्गुल झाला. त्याच्या या कारभाराने वैतागलेल्या सरदारांनीच फक्त सहा महिन्यातच त्याचा काटा काढला. त्याच्या हत्येनंतर रझियाने सत्तासूत्रे आपल्या हातात घेतली.

रझियाने अनेक प्रदेश काबीज केले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार वाढवला. लढाईमध्ये ही आपल्या सैन्याचे नेतृत्व स्वतःच करीत असे आणि प्रत्यक्ष लढाईत सहभागी होत असे. प्रशासनावरील तिची पकड इतकी मजबूत होती की, दिल्लीच्या अनेक उत्तम शासकांमध्ये तिचाही समावेश होतो.

आपल्या कारकिर्दीत तिने अनेक शाळा उभारल्या, मोठमोठी विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि सर्वजनिक वाचनालये उभारली. तिने उभारलेल्या शाळां आणि महाविद्यालयांमध्ये कुराण सोबतच अनेक लोकप्रिय प्राचीन तत्ववेत्ते, मोहम्मदाच्या परंपरा आणि हिंदू तत्वज्ञान, खगोलशास्त्र आणि साहित्य देखील शिकवले जात होते.

तिने स्वतःच्या नावाची नाणी देखील पाडली होती. ज्यावर, “महिलांचा आधारस्तंभ, काळाची सम्राज्ञी, शमशुद्दीन इल्तुमिषची कन्या सुलतान रझिया”, असा मजकूर कोरला होता.

रझियाचा वाढता प्रभाव आणि प्रसिद्धी पाहून अनेक तुर्किश सरदारांना तिच्याबद्दल प्रचंड द्वेष आणि संताप निर्माण झाला होता. एका स्त्री शासकाची सत्ता सहन करून तिची गुलामी करणे त्यांना सहन होत नव्हते. तिचा द्वेष करणाऱ्यामध्ये भटिंडाचा सरदार मलिक इख्तीयार-उद-दिन अल्तुनियाचा देखील समावेश होता.

त्याने इतर सरदारांशी हातमिळवणी करून रझियाच्या विरोधात युद्ध पुकारले. या युद्धात राझियाचा विश्वासू मित्र आणि तिचा अबिसियन गुलाम असेलेला सेवक जमालुद्दीन याकूत मारला गेला. खरतर जमालुद्दीन आणि रझियाबद्दल या सरदारांमध्ये काहीतरी कुजबुज चालू होती.

अर्थातच तिच्या विरुद्ध कट रचण्यासाठी त्यांना काहीतरी बहाणा हवाच होता, म्हणून त्यांच्या मैत्रीचा फायदा घेत त्यांनी राझियाचे चारित्र्यहनन केले. अल्तुनियाने रझियाला कैद करून तिला बंदीवान करून ठेवले. अल्तुनिया हा रझियाचा बालमित्रच होता. त्याचे तिच्यावर प्रेम होते, म्हणूनच तिची आणि जमालुद्दीनची जवळीकता सहन न झाल्याने त्याने हा डाव रचला होता.

पण, रझिया कैदेत असली तरी, तिची शाही बढदास्त ठेवण्यात येत असे. नंतर मृत्युच्या दाढेतून सुटका करून घेण्यासाठी की, अल्तुनिया वरील प्रेमापोटी रझियाने अल्तुनियाशी विवाह केला.

रझियानंतर दिल्लीची सूत्रे मुइज़ुद्दिन बहराम याने आपल्या ताब्यात घेतली होती. रझिया आणि अल्तुनियाने पुन्हा दिल्लीची गादी काबीज करण्याचे नियोजन केले. ते दिल्लीकडे रवाना होणार इतक्यात बहरामच्या फौजांनी दोघाही पती-पत्नीवर हल्ला केला. या लढाईतून निसटल्यानंतर ते दिल्लीतून निघून कैठाल येथे गेले.

पण तिथे हिंदू जाटांनी त्यांना लुटले आणि मारून टाकले असा इतिहास तज्ञांचा दावा आहे. तर, काही इतिहासकरांच्या मते, ते बेहरामच्या सैन्याकडूनच मारले गेले. थोडक्यात रझियाच्या मृत्यूबद्दल कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने, तिचा मृत्यू हे एक न उकलेले कोडेच बनून राहिले आहे.

पण, स्वतः हत्तीवर स्वर होऊन युद्धाचे नेतृत्व करणारी, प्रजेचे हित लक्षात घेऊन त्यांचा हिताचे निर्णय घेणारी, आणि कुशल राज्यकारभार करणारी अशी स्त्री शासक अनुभवण्याचे भाग्य दिल्लीच्या तख्ताला पुन्हा लाभले नाही, हे मात्र निश्चित.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 278 +22