किती वर्षापर्यंत शारीरिक मानसिक क्षमता वाढते?www.marathihelp.com

बदलांची स्वप्नावस्था! वयात येताना मुलांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल

मूलं साधारण दहा-बारा वर्षांचे झाले की, ते आता मोठे झाल्याची जाणीव पालकांना व्हायला लागते. खरे तर बालपण अजून पुरते न संपलेले आणि तारुण्य तसे दूर, असा हा १० ते १८ वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे किशोरावस्था! काव्यविश्व या अवस्थेला 'झोपाळ्यावाचून झुलायचा, फुलायचा आणि खुलायचा' स्वप्नील काळ म्हणते, तर मानसशास्त्राच्या भाषेत हा मुलांसाठी वादळ आणणारा काळ आहे. म्हणूनच आना फ्राइडने मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढीत वेगवान उलथापालथ घडवणाऱ्या या काळाला 'पीरियड ऑफ स्टॉर्म अॅण्ड स्ट्रेस' असे म्हटले आहे.

याच काळात उंची, वजन वेगाने वाढते आणि शरीरातील विविध ग्रंथींतून विशिष्ट संप्रेरके (हार्मोन्स) झरू लागतात. यामुळे शरीराची आंतरिक वाढ परिपक्व होत असते. लैंगिक अवयवांची वाढ होऊन शरीर जननक्षम होण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. याच संप्रेरकांमुळे वाढणाऱ्या दाढी-मिशा, काखे-जांघेतले केस, तारुण्यपिटीका, स्तनांचा बदललेला आकार या अचानक होणाऱ्या शारीरिक बदलांना मुलांना सामोरे जावे लागते. भिन्नलिंगी आकर्षण वाढते. यातूनच अपरिपक्व जिव्हाळा, कच्चे प्रेम उत्पन्न होऊ शकते.

मुलांच्या मानसिकतेतही या वयात अनेक बदल जाणवतात. मी कोण? माझे या जगात येण्याचे प्रयोजन काय? सामाजिक परिघात माझे नेमके स्थान काय? अशा प्रश्नांनी किशोरांच्या भावविश्वात खळबळ उडते. सतत दुसऱ्यांशी तुलना करून आपली जागा तपासून बघितली जाते. स्वतःला सिद्ध करायची धडपड सुरू होते. परिपाठ, परंपरा, सामाजिक नियम झुगारून काहीतरी नवीन, जगावेगळे धाडसी बिनधास्तपणे करून बघायची अनिवार इच्छा होते. कोणी टोकले तर भावना तीव्र होतात. आई-वडील, गुरुजनांचे समजावणीचे सल्ले नकोसे वाटतात. घरी पालकांशी खटके उडू लागतात आणि त्यांच्या शिस्तीविरोधात बंड पुकारलेल्या मुलामुलींना आपल्याला समजून घेणारे केवळ समवयस्क मित्र-मैत्रिणीच आहेत, असे वाटू लागते. त्यांचाच सहवास सतत शोधला जातो.

हाच काळ शिक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. वाढलेल्या अभ्यासाचा आवाका, परीक्षेची भीती, भविष्याची चिंता याचा अस्वस्थ मनावर ताण येतो. तो घालवायचे मित्रांकडून कळलेले काही उपाय (गुटखा, मादक पेये/पदार्थ) वापरून बघायची हुक्की येते आणि मग कधी सवय लागते हे त्या अवस्थेत कळतही नाही.

आपल्या मुलांमधील हे बदल बघून पालकही गोंधळतात. मुलांशी वागावे तरी कसे, हेच कळेनासे होते. मुलांच्या डोक्यात काय चाललंय, याचा अंदाज येईनासा होतो. किशोरावस्थेतील मेंदूच्या संरचनेचे आणि कार्यपद्धतीचे शतकभरापासून होत असलेल्या विविध अभ्यासातून, ही मुले अशी का वागतात, हे शास्त्रज्ञांना बऱ्यापैकी कळू लागले आहे. वयाच्या पहिल्या पाच-सहा वर्षांत प्रचंड वेगाने वाढणारा बालमेंदू पुढची सहा-सात वर्षे काहीसा आराम करतो. अकराव्या-बाराव्या वर्षी तो पुन्हा वेगाने विकसित होऊ लागतो. पण ही वाढ एकसंध नसते. भावनिक मेंदूचे विशिष्ट भाग जास्त कार्यरत होऊ लागतात. यामुळेच खूप राग, घोर निराशा, तीव्र चिंता वाटणे, मनाला जबरदस्त उधाण आणणाऱ्या क्रियांत रमून जाणे, सतत आनंद देणाऱ्या कृतीच्या पाठी धावणे, असे वर्तन दिसू लागते.

विश्लेषक मेंदूचे काही भाग मात्र सावकाश वाढतात. आधी जुळणी झालेल्या मज्जापेशींमध्ये न वापरल्या गेलेल्या जुळण्या नष्ट होतात. काटछाट करून नव्या जुळण्या पक्क्या होऊ लागतात. याला बराच वेळ लागतो. मेंदूचे हेच भाग, विशेषतः कपाळामागचा सर्वांत उत्क्रांत भाग हे पुढे होणारा बरा-वाईट परिणाम लक्षात घेत काम योजना करणे, विवेकाने कृती करणे. नीट विचार करून निर्णय घेणे. इच्छित गोष्टी मिळवायला श्रम करणे, उसंत घेणे, अशा गोष्टींसाठी जबाबदार असतात. साधारणपणे वयाच्या २५ वर्षांपर्यंत हा प्रवास सुरू असतो.

याचाच अर्थ असा की, मेंदू परिपक्व व्हायलाच जर गधे पंचविशी उजाडणार असेल तर त्याआधीच्या किशोरावस्थेत अतिशय प्रखरतेने काम करणाऱ्या भावनिक मेंदू आणि संप्रेरकांच्या छायेत केवढी उथलपुथल होत असेल, हो ना? जर आपल्याला आपल्या मुलांना समजून घेत, या काळात त्यांना मदत करायची असेल तर आपल्याला त्यांच्या विश्वात शिरकाव करावा लागेल. त्यांच्या मेंदूकडे जास्त खुल्या दिलाने बघावे लागेल; त्यांच्या वर्तनामागे दडलेली त्यांची तगमग, अस्वस्थता, गोंधळ लक्षात घ्यावा लागेल.

त्यांचा उद्दामपणा, वाद घालणे हे त्याच्या स्वतंत्र विचार करण्याची सुरुवात असल्याचे पटवून घ्यावे लागेल. कुठल्याही वर्तनसमस्या धीरोदात्त चित्त ठेवून, आपल्या संवादाची शैली बदलत, मुलांच्यात बदलण्याची शक्ती आणि शक्यता आहे, याची मनाशी खूणगाठ बांधून, गरज असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने परिणामकारकरित्या हाताळाव्या लागतील.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 4352 +22