आपण स्वतंत्र व्यवसाय करणार असलात तर याबाबतचे नियोजन कसे कराल?www.marathihelp.com

व्यवसाय म्हटला, की कक्षा रुंदावणे आले, प्रगती, प्रतिष्ठा, ऐश्वर्यही आले. व्यवसाय उत्तम चालल्यास नुसते पैसेच नाही, तर समाजात मानसन्मान लाभतो. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगता येते. व्यवसाय करणारे लोक वेगळेच असतात. त्यांना स्वतःचे असे काही तरी निर्माण करायचे असते. एखाद्या ध्येयाने झपाटलेले लोक ते ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसाय सुरू करतात आणि स्वतःला त्यात झोकून देतात. सामान्यतः एका व्यवसायिकाचे उत्पन्न हे चांगले असते अथवा ते वाढण्यास भरपूर संधी असते. व्यवसाय जसा मोठा होत जातो, तसे व्यावसायिकाचे उत्पन्न वाढते. हल्लीच्या काळात नोकरीतही चांगला पगार मिळतो. मात्र, व्यावसायिकाला त्याचे उत्पन्न काही पटीने वाढवण्याची शक्यता अधिक असते. आपण आज व्यवसायिकाच्या जीवनातील आर्थिक बाजू समजून घेऊ.

एखादा व्यवसाय सुरू करताना त्यासाठी योग्य ती आर्थिक तयारी केली असेल, तर व्यवसायात चढउतार आले, तरीही त्यातून सहजपणे बाहेर पडणे शक्य होते. ही तयारी व्यवसाय सुरू करायचा विचार मनात आला, की लगेच सुरू करायला हवी. व्यवसाय सुरू करायच्या आधी व्यवसायाचे नाव ठरवणे, त्याची नोंदणी करणे, बँकेत खाते उघडणे, योग्य ते इतर परवाने काढणे इत्यादी काम हाती घेतले जाते. अनेकदा असे दिसून येते, की काही कारणाने नोकरी गमवावी लागल्याने व्यवसाय करण्याचा विचार काही लोक करतात. काही वेळेस समोरून एखादी संधी चालून आली म्हणून व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला जातो, तर काही वेळेस अमुक अमुक व्यवसायात चांगला पैसा आहे म्हणून त्यात प्रवेश केला जातो. व्यवसायात नुसते चांगले पैसे आहेत म्हणून किंवा त्याची चलती आहे म्हणून तो करणे कितपत योग्य आहे, हा विचार नीट व्हायला हवा. आपल्यामधे असलेली कौशल्ये कुठल्या कामासाठी अधिक लागू आहेत हे पाहणे महत्त्वाचे असते. उगीच कुणी तरी म्हणते आहे म्हणून त्यांच्या बरोबर व्यवसाय करणे किंवा कोणी व्यवसायात पैसे लावायला तयार आहे म्हणून त्यात उडी घेऊ नये. व्यवसाय सुरू करायच्या आधी त्याबद्दल पूर्ण अभ्यास करायला हवा.

व्यवसायात लागणारे भांडवल किती? त्याला बाजारपेठ कशी आहे? आपले कौशल्य व्यवसायासाठी उपयुक्त आहे का? उत्पादन करणार असाल, तर तयार वस्तुसाठी किती मागणी आहे? त्यात एकूण सगळे खर्च जाऊन किती नफा आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात आणि त्याची उत्तरे शोधून मग व्यवसाय करावा का नाही आणि कोणता, या निष्कर्षाला यावे. साधारणपणे वरील बऱ्याच गोष्टींचा विचार थोड्या फार प्रमाणात केला जातो. मात्र, व्यवसायाच्या आर्थिक बाबींकडे बरेचसे दुर्लक्ष होताना दिसते. या आर्थिक बाबी काय आहेत याचा विचार करू.

नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार मनात आला, की आधी त्यासाठी लागणारे भांडवली खर्च कुठले आहेत ते जाणून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक खर्चाचा आवक जाणून घ्यावा. उत्पादन करायचे असल्यास लागणाऱ्या यंत्राची माहिती घ्यावी आणि त्याचे आयुष्मान लक्षात घेत, त्यातून मिळणारे उत्पादन किती आहे, त्याचे गणित समजून घ्यावे. या सगळ्यासाठी पैसे आपल्याजवळ असतील, तरी पुढे येणाऱ्या खर्चाचा विचार करावा. जसे, की कर्मचाऱ्यांना द्यायचा पगार, विपणनखर्च, जाहिरात इत्यादी. काही महिने किंवा वर्षे आपला व्यवसाय स्थिर होण्यास लागू शकतात, त्याचा अंदाज बांधून तशी तजवीज करावी.

व्यवसाय सुरू करताना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदान आणि विविध योजनांची माहिती घ्यावी. अनुदान मिळते आहे म्हणून व्यवसाय सुरू करणे हे धोरण योग्य नव्हे. अनुदान मिळत असेल, तर त्याचा लाभ घ्यावा. मात्र, अनुदान आहे म्हणून व्यवसाय करणे कितपत योग्य आहे? आपली व्यवसायातील जोखीम उचलण्याची मानसिक तयारी आधी असायला हवी आणि मग आर्थिक तयारी असायला हवी. काही महिन्यांच्या खर्चाची तजवीज असायलाच हवी, शिवाय स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चाची तजवीज असणेही आवश्यक आहे. ही तजवीज अगदी मूलभूत मात्र अतिशय महत्त्वाची आहे,. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्साहाच्या भरात चुकीची पावले उचलू नयेत. असे म्हटले जाते, की घर पाहावे बांधून, तसेच व्यवसाय पाहावा करून. म्हणजे व्यवसाय करणे तितके सोपे नसते आणि ते प्रत्येकाला जमेलच असे नाही. आपण व्यवसाय करण्यात उत्साही असून उपयोग नाही, व्यवसाय करण्यासाठी धडाडी असावी लागते. कठीण परिस्थितीत तग धरता आला पाहिजे. शांतपणे, संयमाने काम करत राहणे हे आपल्याला जमले, तर आपण व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतो. आपण एक चांगले अभियंते असून भागणार नाही, व्यवसायाच्या इतर बाबी आपल्याला समजून शिकाव्या लागतील, तरच आपण यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो. यासाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी करायला हवी.

एक उत्तम व्यावसायिक होणे जसे कठीण आहे, तसेच ते अशक्य नाही. त्यासाठी चौकस विचार करून, उत्तम नियोजन करून मगच त्यात उतरायला हवे. व्यवसाय सुरू करायच्या आधी उत्पादनाचे आर्थिक गणित, खर्चाची योग्य तरतूद, कर्जाच्या रकमेचा आणि हप्ता याचा अंदाज, व्याजचे गणित, वसूली, नफा, इत्यादी इतर गोष्टींचा मेळ जमला, तर यशस्वी व्यावसायिक होणे शक्य आहे.

solved 5
व्यवसाय Friday 16th Dec 2022 : 14:06 ( 1 year ago) 5 Answer 9998 +22